top of page
  • Writer's pictureMalhar Pandey

सह्याद्रीने सांगावा धाडलाय...

सह्यगिरी मुकुट तुझा, दुर्ग दुर्ग बिकट तुझा
सागर तट हा विशाळ, शोभतो अनंत काळ,
मोहकती रूप तुझे, छत्रपती भूप तुझे !

सह्याद्री ! सह्याद्री हा शब्द ऐकताच, मनामध्ये अनेक भावना निर्माण होतात, त्या शब्दबद्ध करणे हे कार्य महाकठीण. डोंगर, कडेकपार्या, घनदाट झाडी, झरे, पाण्याचा खळखळ आवाज, पक्ष्यांची किलबिल, प्राण्यांमुळे झाडातून येणारा सप सप आवाज या सगळ्यात आपण आपल्या अवतीभवतीच्या काँक्रीट जंगलाला विसरून जातो आणि एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतो. या दुनियेत, कसलेही फिल्टर नसतात, लाईक्स आणि शेअर्स ची भूक नसते, इथे असते ती केवळ आणि केवळ, स्वतःला शोधण्याची भूक ! हीच भूक भागवण्यासाठी आपल्यासारखी वेडी माणसं, बिकट वाटा पार करत एखादा ट्रेक पूर्ण करतो !

असाच एक ट्रेक, (झुंज चा दुसरा ट्रेक), या वेळेला, वाई तालुक्यातील कमळगड येथे आयोजित केला होता. विचित्रगडाच्या ट्रेक नंतर, आम्हाला, अनेकांनी पुढच्या ट्रेक बद्दल विचारणा केली होती. 'आम्हालाही यायचं आहे, पुढचा ट्रेक केव्हा? पुढचा ट्रेक कुठे', अशी उत्सुकता पाहून, विचित्रगड मोहीम पूर्ण होताच पुढच्या ट्रेक ची घोषणा केली आणि कमळगड हे नाव, सुश्रुत किनगे व ऋतुराज काळे यांनी सुचवलं. कमळगड, विचत्रगडाच्या तुलनेत अवघड असे आम्हाला आधीच या दोघांनी सांगून ठेवलं होतं. प्रश्न असा होता कि अवघड असून या ट्रेक ला लोकं येतील का ? पोस्टर्स तयार झाले, लिंक तयार झाली आणि ट्रेक ची घोषणा केली.

नोव्हेंबर २०२२ चा ट्रेक २६ तारखेला, स्थळ कमळगड ! आश्चर्य ! घोषणा केल्याच्या २ दिवसात, २० लोकांनी फॉर्म भरला होता. एखाद्या अवघड ट्रेक ला इतक्या लवकर इतका प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं. आम्हा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तितकाच उत्साह वाढला. ट्रेक ची तयारी सुरु झाली. रेकी पूर्ण करून सुश्रुत, ऋतुराज, विक्रम आले. खाण्याची सोय झाली आणि शेवटी, ट्रेक चा दिवस आला.

बरोबर ५ वाजता आम्ही, स्वारगेट वरून कमळगडाच्या दिशेने निघालो. भल्या पहाटे उठवल्यामुळे आमच्या बद्दल आलेल्या लोकांना शंभर टक्के राग आला असणार हे लक्षात आलं. वाई पर्यंत पोहोचायला जवळपास अडीच तास जाणार होता, तेवढ्यात सगळ्यांनी मस्त झोप काढून घेतली. ८.३० च्या सुमारास, गाडी, गडाच्या पायथ्याजवळील तुपेवाडी इथे पोहोचली. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून, ट्रेक जबरदस्त होणार याची चाहूल आम्हा सर्वाना लागली होती. पूजा बडेकर आणि वैष्णवी कुंभार यांनी ट्रेक ला आलेल्या सर्वांसाठी घरून सँडविच तयार करून आणले होते. सँडविच, केळी आणि ग्रीन टी चा नाश्ता झाल्यावर, सुश्रुत आणि ऋतुराज ने सगळ्यांना ट्रेकिंग इंस्ट्रक्शन दिल्या, वॉर्म अप व्यायाम करवून घेतला आणि ट्रेकला सुरुवात झाली. केवळ ३५ मिनिटात, चढ संपेल आणि पुढे सगळा पठार लागेल असे राजकारणी आश्वासन आमच्या ट्रेक लीडर ने आम्हाला दिले. आम्ही ३५ मिनिटे कधी संपत आहेत, याची वाट पाहत चढू लागलो, पण तासाभराने कळलं कि हि ३५ मिनिटे काही केल्या संपणार नाहीयेत.

हळू हळू करत, आम्ही सगळे जण, ३५ मिनिटाने येणाऱ्या पठाराजवळ ३ तासांनी पोहोचलो. सगळे जण दमले होते होते, पण वर ताकाची सोय केली होती. थंडगार ताकाचा ग्लास तोंडाला लावताच सगळ्यांचे चेहरे पुन्हा खुलून गेले. पुढचा टप्पा पार करण्यासाठी सगळे सज्ज झाले. पुढचा टप्पा म्हणजे, पठारापासून किल्ल्यापर्यंत जाण्याचा टप्पा. सुमारे २० मिनिटात, अत्यंत छोट्या वाटेतून पुढचा टप्पा पार केला आणि समोर दिसला तो बालेकिल्ला आणि कमळगडावरील सुप्रसिद्ध कावेची विहीर. वरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य, सह्याद्रीच्या जंगलातून येणारी वाऱ्याची झुळूक हे सगळा मागच्या ३ तासात केलेल्या कष्टाचं चीज करणारं होतं. क्षणात थकवा निघून गेला. कावेची विहीर पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना होती. ४० फूट, किल्ल्याच्या पोटात असलेली विहीर उतरताना येणारा थंडावा अनुभवण्यासारखा होता. विहीर पाहून झाल्यावर, किल्ल्यावरील एका खुल्या पटांगणावर सुश्रुत ने शिवरायांच्या नावाचा जोरदार जयघोष केला. जयघोष केल्यावर, कानावरून जोरात वाहिलेला वारा म्हणजे साक्षात महाराजांचाच आशीर्वाद असं वाटत होतं. महाराजांचे नाव घेत आम्ही पुन्हा पठारावर आलो, ज्यांच्याकडून आम्ही ताक घेतले होते, त्यांच्याच कडे झुंज ने जेवणाची सोय केली होती. 'आबा' या नावाचे एक गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबीय या गडावर राहतात. आबांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ताटं वाढली. नाचणीची भाकरी, झुणका (पिठलं), मिरचीचा ठेचा, कांदा आणि थंडगार, गडावरील झऱ्याचे पाणी !

जेवणाचा पहिला घास जाताच, आपोपाप मुखातून 'अन्न हे पूर्ण ब्रह्म' हे उद्गार निघाले. गरम गरम नाचणीची भाकरी आणि पिठलं हेच सर्वस्व हे त्या वातावरणात वाटत होतं. आबा आणि त्यांच्या घरचे आम्हाला, त्यांच्या स्वतःच्या आप्तस्वकीयांसारखे आग्रह करत होते. जेवणाचा शेवट त्याच थंडगार ताकाने झाला. सगळे सगळे तृप्त झाले. जाता , जाता झुंज च्या रीती प्रमाणे, लहानग्यांना सर्टिफिकेट दिले. आमच्या सोबत, एअर फोर्स मध्ये ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेली 'दिव्या' नावाची ताई होती, तिला झुंज च्या वतीने एक पुस्तक भेट म्हणून दिले. परतीचा प्रवास सुरु झाला, गड उतरू लागलो, जवळपास १.३० तासात सगळे खाली पोहोचले, ट्रेक लीडर्स ने 'स्ट्रेचिंग' करून घेतली आणि ट्रेक चा समारोप झाला !

निःसंशयपणे सगळ्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता पण कोणीही कंटाळले नव्हते आणि तोच आमचा अर्थात झुंज च्या आयोजक टीम चा विजय होता. ट्रेक संपताच, दुसऱ्या दिवसापासून, पुढचा ट्रेक कधी हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे ! हा उत्साह कुठून येतो माहित नाही, कदाचित, महाराजांवर, सह्याद्रीवर आणि या मराठी मातीवर असलेल्या भक्तीमुळेच हि ऊर्जा तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात येत असावी...

- मल्हार पांडे

सह्याद्री ! सह्याद्री हा शब्द ऐकताच, मनामध्ये अनेक भावना निर्माण होतात, त्या शब्दबद्ध करणे हे कार्य महाकठीण. डोंगर, काडेकपार्या, घनदाट झाडी, झरे, पाण्याचा खळखळ आवाज, पक्ष्यांची किलबिल, प्राण्यांमुळे झाडातून येणारा सप सप आवाज या सगळ्यात आपण आपल्या अवतीभवतीच्या काँक्रीट जंगलाला विसरून जातो आणि एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतो. या दुनियेत, कसलेही फिल्टर नसतात, लाईक्स आणि शेअर्स ची भूक नसते, इथे असते ती केवळ आणि केवळ, स्वतःला शोधण्याची भूक ! हीच भूक भागवण्यासाठी आपल्यासारखी वेडी माणसं, बिकट वाटा पार करत एखादा ट्रेक पूर्ण करतो !

असाच एक ट्रेक, (झुंज चा दुसरा ट्रेक), या वेळेला, वाई तालुक्यातील कमळगड येथे आयोजित केला होता. विचित्रगडाच्या ट्रेक नंतर, आम्हाला, अनेकांनी पुढच्या ट्रेक बद्दल विचारणा केली होती. 'आम्हालाही यायचं आहे, पुढचा ट्रेक केव्हा? पुढचा ट्रेक कुठे', अशी उत्सुकता पाहून, विचित्रगड मोहीम पूर्ण होताच पुढच्या ट्रेक ची घोषणा केली आणि कमळगड हे नाव, सुश्रुत किनगे व ऋतुराज काळे यांनी सुचवलं. कमळगड, विचत्रगडाच्या तुलनेत अवघड असे आम्हाला आधीच या दोघांनी सांगून ठेवलं होतं. प्रश्न असा होता कि अवघड असून या ट्रेक ला लोकं येतील का ? पोस्टर्स तयार झाले, लिंक तयार झाली आणि ट्रेक ची घोषणा केली.

नोव्हेंबर २०२२ चा ट्रेक २६ तारखेला, स्थळ कमळगड ! आश्चर्य ! घोषणा केल्याच्या २ दिवसात, २० लोकांनी फॉर्म भरला होता. एखाद्या अवघड ट्रेक ला इतक्या लवकर इतका प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं. आम्हा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तितकाच उत्साह वाढला. ट्रेक ची तयारी सुरु झाली. रेकी पूर्ण करून सुश्रुत, ऋतुराज, विक्रम आले. खाण्याची सोय झाली आणि शेवटी, ट्रेक चा दिवस आला.

बरोबर ५ वाजता आम्ही, स्वारगेट वरून कमळगडाच्या दिशेने निघालो. भल्या पहाटे उठवल्यामुळे आमच्या बद्दल आलेल्या लोकांना शंभर टक्के राग आला असणार हे लक्षात आलं. वाई पर्यंत पोहोचायला जवळपास अडीच तास जाणार होता, तेवढ्यात सगळ्यांनी मस्त झोप काढून घेतली. ८.३० च्या सुमारास, गाडी, गडाच्या पायथ्याजवळील तुपेवाडी इथे पोहोचली. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून, ट्रेक जबरदस्त होणार याची चाहूल आम्हा सर्वाना लागली होती. पूजा बडेकर आणि वैष्णवी कुंभार यांनी ट्रेक ला आलेल्या सर्वांसाठी घरून सँडविच तयार करून आणले होते. सँडविच, केळी आणि ग्रीन टी चा नाश्ता झाल्यावर, सुश्रुत आणि ऋतुराज ने सगळ्यांना ट्रेकिंग इंस्ट्रक्शन दिल्या, वॉर्म अप व्यायाम करवून घेतला आणि ट्रेकला सुरुवात झाली. केवळ ३५ मिनिटात, चढ संपेल आणि पुढे सगळा पठार लागेल असे राजकारणी आश्वासन आमच्या ट्रेक लीडर ने आम्हाला दिले. आम्ही ३५ मिनिटे कधी संपत आहेत, याची वाट पाहत चढू लागलो, पण तासाभराने कळलं कि हि ३५ मिनिटे काही केल्या संपणार नाहीयेत.

हळू हळू करत, आम्ही सगळे जण, ३५ मिनिटाने येणाऱ्या पठाराजवळ ३ तासांनी पोहोचलो. सगळे जण दमले होते होते, पण वर ताकाची सोय केली होती. थंडगार ताकाचा ग्लास तोंडाला लावताच सगळ्यांचे चेहरे पुन्हा खुलून गेले. पुढचा टप्पा पार करण्यासाठी सगळे सज्ज झाले. पुढचा टप्पा म्हणजे, पठारापासून किल्ल्यापर्यंत जाण्याचा टप्पा. सुमारे २० मिनिटात, अत्यंत छोट्या वाटेतून पुढचा टप्पा पार केला आणि समोर दिसला तो बालेकिल्ला आणि कमळगडावरील सुप्रसिद्ध कवीची विहीर. वरून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य, सह्याद्रीच्या जंगलातून येणारी वाऱ्याची झुळूक हे सगळा मागच्या ३ तासात केलेल्या कष्टाचं चीज करणारं होतं. क्षणात थकवा निघून गेला. कवीची विहीर पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना होती.

४० फूट, किल्ल्याच्या पोटात असलेली विहीर उतरताना येणारा थंडावा अनुभवण्यासारखा होता. विहीर पाहून झाल्यावर, किल्ल्यावरील एका खुल्या पटांगणावर सुश्रुत ने शिवरायांच्या नावाचा जोरदार जयघोष केला. जयघोष केल्यावर, कानावरून जोरात वाहिलेला वारा म्हणजे साक्षात महाराजांचाच आशीर्वाद असं वाटत होतं. महाराजांचे नाव घेत आम्ही पुन्हा पठारावर आलो, ज्यांच्याकडून आम्ही ताक घेतले होते, त्यांच्याच कडे झुंज ने जेवणाची सोय केली होती. 'आबा' या नावाचे एक गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबीय या गडावर राहतात. आबांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ताटं वाढली. नाचणीची भाकरी, झुणका (पिठलं), मिरचीचा ठेचा, कांदा आणि थंडगार, गडावरील झऱ्याचे पाणी !

जेवणाचा पहिला घास जाताच, आपोपाप मुखातून 'अन्न हे पूर्ण ब्रह्म' हे उद्गार निघाले. गरम गरम नाचणीची भाकरी आणि पिठलं हेच सर्वस्व हे त्या वातावरणात वाटत होतं. आबा आणि त्यांच्या घरचे आम्हाला, त्यांच्या स्वतःच्या आप्तस्वकीयांसारखे आग्रह करत होते. जेवणाचा शेवट त्याच थंडगार ताकाने झाला. सगळे सगळे तृप्त झाले. जाता , जाता झुंज च्या रीती प्रमाणे, लहानग्यांना सर्टिफिकेट दिले. आमच्या सोबत, एअर फोर्स मध्ये ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालेली 'दिव्या' नावाची ताई होती, तिला झुंज च्या वतीने एक पुस्तक भेट म्हणून दिले. परतीचा प्रवास सुरु झाला, गड उतरू लागलो, जवळपास १.३० तासात सगळे खाली पोहोचले, ट्रेक लीडर्स ने 'स्ट्रेचिंग' करून घेतली आणि ट्रेक चा समारोप झाला !

निःसंशयपणे सगळ्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता पण कोणीही कंटाळले नव्हते आणि तोच आमचा अर्थात झुंज च्या आयोजक टीम चा विजय होता. ट्रेक संपताच, दुसऱ्या दिवसापासून, पुढचा ट्रेक कधी हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे ! हा उत्साह कुठून येतो माहित नाही, कदाचित, महाराजांवर, सह्याद्रीवर आणि या मराठी मातीवर असलेल्या भक्तीमुळेच हि ऊर्जा तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात येत असावी...

- मल्हार पांडे

138 views0 comments
bottom of page